हुतात्मा हरी मकाजी नाईक म्हणजे इतिहासाच्या पानामध्ये दडलेले एक कर्तुत्ववाण व्यक्तिमत्व, आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर थोड्याच अवधीत ब्रिटीश प्रशासनाला सळोकीपळो करून सोडले आणि अखेरीस येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोषात हौतात्म्य स्वीकारले. अशा दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजां विरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणा-या धन दांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जातीधर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी ,महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.महाराष्ट्राचे वैभव असलेले सह्याद्री वरील गड किल्ले यांच्या रक्षणाची जबाबदारी रामोशी समाजा कडे होती. परंतु इंग्रजांनी गड किल्ले खालसा केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. टोळीने संघटीत राहून दरोडा टाकायचा व आपली उपजीविका चालवायची असा रामोशी समाजाचा दिनक्रम चालू असताना क्रांतिवीर उमाजीने या दिन क्रमाला वेगळी वाट दाखवून आशेचा किरण दाखविला. परंतु त्यांच्या नंतर रामोशी समाज जुन्याच वाटेने चालू लागला. इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडा ची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरिमकाजी नाईक.जिल्हा सातारा खटाव तालुक्यातील कळंबी गावाचा रहिवासी असलेला हरी, धाडसी आणि शूरवीर होता, पूर्व कल्पना देवून धाडसी वृत्तीने दरोडा घालणे ही त्याची खासियत होती. त्याच्यातील धाडसीवृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे कि ती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरी च्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देश सेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोर गरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सह्भागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी कामकरणा-या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोर गरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून हरीला पकडून देणा-यास अथवा त्याची माहितीकळविणा-यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा ठाणे अंमलदार अकबर अली यास हरी मकाजी आपल्या कुटुंबीयासोबत नजीकच्याच बावी गावात येणार असल्याची खबर मिळाली. त्याने त्वरेने हालचाली करून वरिष्ठांपर्यंत ही बातमी पोहोचवली आणि इंग्रजअधिका-याच्या नेतृत्वाखाली बावी कडे कूच केले. गावक-यांनी हरी आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण दिले. परंतु गोळीबाराच्या चकमकीत हरीचा सासरा मारला गेला आणि हरी त्याच्या जोडीदारासह जखमी अवस्थेत पकडला गेला. तो दिवस होता १३ मार्च १८७९, हरी सोबत त्याच्या घरातील पाच महिला आणि काही गावक-यांनाही अटक करण्यात आली. ब्रिटीश प्रशासनाने जाहीर केलेले एक हजार रुपयाचे इनाम अकबर अली याला देण्यात आले.हरीला पुण्याला आणून त्याच्यावर खटला चालविण्यात आला व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हरीला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी अत्यंत क्रूरपणे व त्वरित करण्यात आली. इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचे धाडस परत कोणत्याही रामोशी समजातील लोकांनी करू नये म्हणून जाहीर फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवती अमावस्येला रामोशी समाजातील प्रत्येक घरातील एकाने तरी सोमवती यात्रेसाठी जेजुरीला हजेरी लावण्याची पूर्व परंपरा असल्याने या यात्रेला रामोशांची गर्दी होणार हे ओळखून जेजुरीला पालखी मार्गालगत फाशी देण्याची जागा निवडण्यात आली. भर सोमवती दिवशी दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात हरीला फाशी देणार असल्याची दवंडी पिटण्यात आली. आणि सशस्त्रपोलीस गराड्यात अनेक रामोशांच्या डोळ्यादेखत ०४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून फाशी देण्यात आले. उमाजी प्रमाणेच हरी श्रीखंडेरायाचा जयजयकार करत फासावर चढला.
हरीनंतर त्याचा भाऊ तात्या मकाजी आणि रामाकृष्णा नाईक यांनी काही काळ उठाव केला, परंतु ते फार काळ हे कार्य करू शकले नाहीत. देशासाठी हरी फासावर चढला परंतु त्याच्या पश्चात त्याचा विसर सर्वांनाच पडला. आज ते वडाचे झाडही अस्तित्वात नाही आणि हरीच्या हौतात्म्य स्मृती जपण्याची गरजही कुणाला उरली नाही. सरकार दरबारीही सारेच अलबेल आहे. महाराष्ट्र शासनाने हुतात्मा स्मारक उभे करून हरी मकाजीच्या स्मृती जगविण्याचा अल्पसा प्रयत्न केला पण त्याने काही साध्य झाले असे वाटत नाही. वाममार्गावर चालणा-या हरीने देशासाठी आपला मार्ग बदलला आणि हौतात्म्य स्वीकारले, आणि आम्हाला मात्र त्याच्या कार्याचा विसर पडावा यासारखे दुसरे कोणते दुर्दैव नाही